जालना - अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालून पंचेचाळीस तोळे सोने लुटल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास समोर आली. पहाटे चार वाजेच्या सुमारास दगडफेक करत शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी डाव साधला. यामध्ये 45 तोळे सोनं आणि 1 लाख 43 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
श्रीमंत तुकाराम खटके यांचे वडीगोद्रीजवळील औरंगाबाद-बीड महामार्गानजीक घर आहे. दिवाळीसाठी त्यांच्याकडे दोन्ही मुली आल्या होत्या. यावेळी कुटुंबीय झोपलेले असतानाच दरोडेखोरांनी शेजारील घराचा कडी-कोयंडा लाऊन खटके यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी खटके कुटुंबीय जागे झाले. आरडाओरड सुरू झाला. मात्र या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी रोख रक्कम व दागिने लांबवले. त्यानंतर पळ काढत असताना चोरट्यांनी खटके कुटुंबीयांवर जोरदार दगडफेक केली.