महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2020, 3:59 PM IST

ETV Bharat / state

दाभाडी ते म्हसला दरम्यानचा पूल गेला वाहून, 10 गावातील नागरिकांचे हाल

तालुक्यातील म्हसला ते दाभाडी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अर्धवट अवस्थेतील पूल पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेला आहे. दाभाडी येथे मुख्य बाजारपेठ आहे.

bridge between Dabhadi and Mhasla was carried away in the rain in jalna
दाभाडी ते म्हसला दरम्यानचा पूल गेला वाहून

बदनापूर (जालना) - तालुक्यातील म्हसला ते दाभाडी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अर्धवट अवस्थेतील पूल पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेला आहे. दाभाडी येथे मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे म्हसलासह जवळपास १० गावांच्या ग्रामस्थांना दाभाडीला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

दाभाडीहून म्हसला या गावासह आजूबाजूच्या दहा ते बारा गावांचे व्यवहार चालतात. रूग्णालये, बँका, बियाणे-खते व इतर व्यावसायिकांचा दाभाडीशी संपर्क येतो. दाभाडी ते म्हसला या रस्त्यावर मेव्हणा गावाजवळील पुलाचे काम सुरू करण्यात आलेले होते. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरील ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडलेले होते. नुकत्याच झालेल्या पावसाने हा अर्धवट असलेला पूलही वाहून गेला. त्यामुळे या भागात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही.

म्हसला, खामगाव, तळणी, लोधेवाडी, भातखेडा, राजेवाडी आदी १० गावांचा दाभाडीशी संपर्क या रस्त्यानेच आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हसलापासून दुसरा एक पर्यायी रस्ता असला तरी त्यामुळे जवळपास ५ ते ७ किलोमीटरचा फेरा वाढतो. तसेच तो रस्ताही अतिशय खराब आहे. त्यामुळे वाहतूक करणे कठीण जात आहे.

सध्या बियाणे, खते याची आवश्यकता आहे. मात्र, शेतकऱ्यांना रस्ताच नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details