जालना- ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह स्थापन करावे, यांसह विविध मागण्यासांठी आज (दि. 20 जाने.) शहरातील गांधीचमन येथे चार तास धरणे आंदोलन करण्यात आले.
ब्राह्मण समाजाचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय देव पूजा, कर्मकांड, पौरोहित्य हे पारंपारिक व्यवसाय ग्रामीण भागातून कालबाह्य झाले. त्यामुळे ब्राह्मण समाजाचे अस्तित्व कमी झाले आहे आणि तो शहरी भागाकडे आला. मात्र, उपजीविकेचे साधन नसल्यामुळे आज ब्राह्मणांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शासकीय नोकरी नाही, खासगी व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही, आरक्षण नसल्यामुळे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे हा समाज अडचणीत सापडलेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वरील मागण्यांसोबतच ब्राह्मण पुरोहितांना 5 हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात नियुक्ती करावी, समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला व वाईट परिणाम शोधून आयोगाची शासनस्तरावर नेमणूक करावी. ब्राह्मण समाजाच्या महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक थांबून बदनामी विरोधी कायदा करावा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. या मागण्यांचा समावेश आहे.