जालना -ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या समाजाने जुन्या जालन्यातील चमन परिसरात ताम्हण-पळी वाजवा आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
चमन परिसरात ताम्हण-पळीचा आवाज
अन्य आंदोलनामध्ये येणाऱ्या आवाजापेक्षा या आंदोलनात ताम्हण-पळी वाजवली गेली. तांब्याच्या धातूचे एका हातामध्ये ताम्हण आणि दुसऱ्या हातामध्ये संध्या करण्याची पळी घेऊन या समाजाने ताम्हण-पळी वाजवत आंदोलन केले. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीदेखील ताम्हण-पळी वाजवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.
या आहेत मागण्या
- समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे.
- प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करावे.
- केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावे
- ब्राह्मण समाजावर बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणेच कारवाई करण्यात यावी.
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.
- ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात.
- पुरोहित समाजाला मासिक पाच हजार रुपयांचे मानधन सुरू करण्यात यावे. यासह अन्य मागण्या होत्या.
हेही वाचा -जालना जिल्ह्यातील मेटारोल इस्पात कंपनीत स्फोट; १ ठार, १ जखमी