जालना- पत्नीला प्रेमसंबंध कळले, त्यामुळे पत्नी सोडून गेली. प्रेयसीचे लग्न झाल्याने राग अनावर झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून तिच्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचे मेसेज टाकत आत्महत्येचा बनाव केला. या प्रकरणी खून प्रियकर सचिन गायकवाड सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सचिन गायकवाडचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. पण, सचिनने दुसऱ्या मुलीसह विवाह केला. नंतर सचिनच्या पत्नीला त्याचे प्रेमसंबंध कळले. त्यामुळे ती सचिनला सोडून आपल्या माहेरी गेली. त्यानंतर निराश झालेला सचिन आपल्या प्रेयसीशी संपर्क साधला. तिने शनिवारी (दि. 21 डिसें.) अंबड येथे आईस्कीम खाण्यासाठी बोलवले. त्याच्या विनंतीला मान देत प्रेयसी सचिनला भेटायला गेली. त्यानंतर दोघेही शिंदेवाडी येथे त्यांच्या मित्राच्या घरी गेले.
मित्राच्या घरी कोणीच नव्हते. त्यानंतर सचिनने पत्नी सोडून गेल्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण, तिने तिच्या कुटुंबीयांना माहिती न देता, परतूर येथील एका युवकाशी नोंदणी पद्धतीने लग्न केले होते. घरगुती कारणांमुळे नवऱ्याच्या संमतीने ती लग्नानंतरही आपल्या माहेरी राहत होती. तिने सचिनला विवाहाचे फोटोही दाखवले. त्यानंतर सचिनचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने ओढणीने तिचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला.