जालना-राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ आणि त्यांनी मागितलेल्या खंडणीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (दि. 21 मार्च) आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सावरकर चौकात आंदोलन
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (रविवार) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करून अशा गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
खंडणीखोर गृहमंत्री
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे खंडणीखोर असल्याचा आरोप केला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करायला लावणारे हे खंडणीखोर मंत्री भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारे आहेत आणि आता या प्रकारामुळे त्यांचे हे दुटप्पी धोरण उघडकीस आले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
पोलीस निरीक्षकांनी स्वीकारले निवेदन
पोलीस ठाणे सदर बाजार च्या हद्दीत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येत असल्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी हे निवेदन स्वीकारले. दरम्यान या आंदोलनाच्या वेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता.
हेही वाचा -रुग्ण संख्या वाढल्याने काळजी घ्यावी, मात्र भीतीचे कारण नाही - राजेश टोपे
हेही वाचा -जालना: ट्रकची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा मृत्यू