जालना - दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनातील विरोधकांचे राजकारण आणि कायद्यांवरील सरकारची भूमिका, यांसदर्भात राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अपक्षेप्रमाणे पत्रकारांनी सध्या चर्चेचा विषय ठरलेले खासदार रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर खासदार कराड यांनी दोन वेळा हात जोडून त्यावर मी काय बोलणार? असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारताच खासदार कराड यांनी जोडले हात केंद्राने केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. मात्र, आंदोलक अडेलतट्टू धोरण करत असल्यामुळे यामधून तोडगा निघत नाही. विरोधक हा कायदा समजून घेण्यास तयार नाहीत. या कायद्यात जी तरतूद केली आहे. ती शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांना अपेक्षित असलेली आहे, असे कराड म्हणाले.
विरोधक दिशाभूल करतायं -
शरद पवार यांनीदेखील अशा सूचना कृषी मंत्री असताना पत्रात नमूद केल्या होत्या. त्याच सूचना या कायद्यामध्ये घेण्यात आल्या आहेत. मात्र, विरोधकांना राजकारण करायचे आहे. त्यामुळे ते दिशाभूल करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सरकार चर्चेसाठी तयार -
सरकार आणि केंद्रीय कृषिमंत्री आंदोलकांचा सोबत चर्चा करण्यासाठी कधीही तयार आहेत. आंदोलकांनी सुचवलेल्या काही दुरुस्त्याही केंद्रीय कृषीमंत्री करण्यासाठी तयारी दर्शवित आहेत. मात्र, आंदोलक कायदाच रद्द करण्याची मागणी करत आहेत. त्यांचे हे धोरण अडेलतट्टू असून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, असे कराड म्हणाले.
शेतकऱ्यांनी कृषी कायदे पूर्ण समजावून घ्यावे -
कृषी कायद्यामुळे शेतकरी समृद्ध होणार आहे. त्याने उत्पादन केलेला माल तो जिथे योग्य भाव मिळेल तिथे विकू शकणार आहे. त्याला तो साठवून देखील ठेवता येणार आहे. मात्र, या सर्व तरतूदीची दिशाभूल करून विरोधक शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे कायदे पूर्ण समजावून घ्यावे, असे आवाहनही कराड यांनी केले. यावेळी भास्कराव दानवे, नगरसेवक अशोकराव पांगारकर, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, सुहास मुंडे आदींची उपस्थिती होती
हेही वाचा -दिल्ली चलो आंदोलनाचा १९वा दिवस; आज शेतकऱ्यांचे उपोषण, पाहा LIVE अपडेट्स..