जालना - कोरोना महामारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी या महामारीची दाहकता तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे बेघरांना, गरजूंना या वर्षी एक वेळचे जेवणदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवभोजन थाळीची संख्या वाढविल्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी जीवदान ठरत आहे.
जिल्ह्यात 15 ठिकाणी वाटप -
जालना शहरामध्ये बस स्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय, रेल्वे स्थानक, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मोंढा, अशा पाच ठिकाणी हे शिव भोजन मिळत आहे. तर उर्वरित 10 केंद्र हे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत. 26 जानेवारी 2020 रोजी योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीची दोन महिने प्रत्येक थाळी दहा रुपयांत देण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये कोविड-19 आजार आला. त्यामुळे काही दिवस ही थाळी पाच रुपयांत मिळत होती. सद्यस्थितीत परिस्थितीमध्ये ही थाळी पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. त्याचसोबत दिवसाकाठी दोनशे थाळी भोजन वाटप करण्याची मर्यादा होती. ती सध्या 100 ने वाढवून तीनशेपर्यंत करण्यात आली आहे. 15 मेपर्यंत हे भोजन वाटप करण्याचे आदेश शिवभोजन चालकांना देण्यात आले आहेत. फक्त थाळी वाढविली नाही, तर वाटप करण्याची वेळदेखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गरजू, बेघर लाभार्थ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.