जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असतानाही काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे नगर पंचायतकडून बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅरिकेटिंग करून रस्त्यावर कोरोना जागृतीपर संदेश लिहिले आहे.
कोरोना रोगाचा शिरकाव बदनापूरमध्ये होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या बदनापूरात सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 पर्यंत दुकाने उघडी ठेवून इतरवेळी दुकाने बंद करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसून आले.
यामुळे, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे व अभियंता गणेश ठुबे यांनी जनजागृती बरोबरच संदेश देण्यासाठी म्हणून बदनापूर येथील मध्यवस्तीत असलेले व मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात चारी बाजूने येणाऱ्या रस्त्याला थेट बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले. तर, रस्त्यावर पेंटर आणून रस्त्यावर येऊ नका, नसता कोरोना घरात येईल असा संदेशच लिहून ठेवला. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनानेही विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यावर कारवाईचे संकेत दिले आहे. तसेच गावात ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावलेले असून गस्तही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. व्यापाऱ्यांनीही ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने उघडल्यास दुकानदारांवर थेट कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले असून सर्वांनी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.