जालना - शासनाने बंदी घातलेली असतानादेखील शहरासह तालुक्यात अवैधरित्या विविध कंपन्यांचा गुटखा सर्रास विक्री केला जातोय. तर, औषध अन्न प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने गुटका माफियांना सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यातील कस्तुरबाडी येथे एका घरामध्ये लाखो रुपयांचा गुटखासाठा असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून १ लाख २५ हजारांचा गुटखा व मोटार सायकल असा एकंदरीत १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली असून शहरातील सर्वच विक्रेत्यांनी टपऱ्या बंद करून पळ काढला आहे.
शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांच्या गुटखा विक्रीवर बंदी आणलेली आहे. मात्र, बदनापूर शहरासह तालुक्यात सर्रास गोवा, माणिकचंद आदी गुटख्यांची विक्री केली जाते. प्रत्येक टपऱ्यांवर विविध कंपनीच्या गुटख्यांची विक्री केली जात असताना औषध अन्न प्रशासन विभाग मात्र सोयीस्करपणे याकडे कानाडोळा करीत असल्याने गुटखा माफिया राजरोसपणे विक्री करीत आहेत. शहरासह तालुक्यातही गुटक्याची विक्री होत असताना अनेकवेळा पोलीस प्रशासनाने कारवाई केली. मात्र, शहरात येणारा माल ज्या व्यापाऱ्यांकडून येतो त्यांच्यावर पोलीस तपासात कारवाई झालेली नाही. त्यामुळे, यामागचे नेमके गुपित काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
२३ फेब्रुवारीला शहरातील शंकर नगर भागात कस्तुरवाडी येथील एक व्यक्ती काही किरकोळ दुकानदारांना गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना मिळाली. त्याआधारे त्यांनी सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, प्रेमदास वनारसे, शेख इस्माईल, करणसिंग जारवाल, चरणसिंग ब्राह्मवत, महिला पोलीस कर्मचारी पूजा वडगुजर यांनी सापळा रचला. दरम्यान, शंकरनगरमध्ये जनार्दन रामकिसन नेमाने याला मोटारसायकलसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पिशवीमध्ये गोवा गुटख्याचे पॅकेट आढळून आले. घटनास्थळी पंचनामा करून आरोपीस पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपीस पोलिसी खाक्या दाखवितात त्याने तालुक्यातील कस्तुरवाडी येथील घरी माल असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीस सोबत घेऊन कस्तुरवाडी गाठले असता घरात गुटख्याचे १२ पोते आढळून आले. सदर माल ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून तब्बल १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि 50 हजार किमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बदनापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे मात्र दणाणले आहेत.