महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक कर्जासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी 'बँक आपल्या गावी' उपक्रम - बदनापूर बँक ऑफ महाराष्ट्र उपक्रम

पीक कर्ज मंजुरीसाठी बँकेत चकरा माराव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्र, बदनापूर शाखेच्या वतीने थेट गावात जाऊन जवळपास 150 शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज भरून घेऊन एक नवा उपक्रम राबवला आहे.

बदनापूर जालना
बदनापूर जालना

By

Published : May 27, 2020, 4:52 PM IST

बदनापूर (जालना) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन व जमावबंदीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. पीक कर्ज मंजुरीसाठी बँकेत चकरा माराव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्र, बदनापूर शाखेच्या वतीने थेट गावात जाऊन गावातील जवळपास 150 शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज भरून घेऊन एक नवा उपक्रम राबवला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षित अंतर राखण्याचे आदेश असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बँकेच्या शाखेतही गर्दी होऊ न देण्याचे निर्देश आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर कर्जमुक्त झालेले शेतकरी तसेच नवीन पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी बँकेसमोर होऊ लागली होती. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्यामुळे बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक चेतन वानखेडे यांनी या शेतकऱ्यांना थेट गावातच सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तालुक्यातील धोपटेश्वर येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी थेट गावात जाऊन पीक कर्जाबाबतचे अर्ज व इतर कागदपत्रे घेण्याचा निर्णय घेतला.

बुधवार 27 मे रोजी थेट बँकेचे प्रतिनिधी राहुल शेळके, अनिल हिवराळे यांनी धोपटेश्वर येथील कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन पीक कर्ज मागणारे शेतकरी व इतर कृषी विषयक कर्ज मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरणा करून घेऊन त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचीही पूर्तता जागेवरच करून घेतली. यासाठी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना येथील माजी सरपंच नंदकिशोर दाभाडे व इतरांनी सहकार्य केले. कर्जमाफीनंतर पुन्हा नव्याने पीक कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.

यावेळी गावातील जवळपास 150 ते 175 शेतकऱ्यांकडून कर्जपुरवठा करण्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी पीक कर्जासाठी विविध बँकांमध्ये चकरा मारत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्जासाठी थेट ‘बँक आपल्या गावी’ असा उपक्रम राबवल्याबद्दल बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details