महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार बच्चू कडूंची लोकसभेच्या रिंगणातून माघार; पाठिंबा कोणाला? - aurangabad

भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हटले, तेव्हापासून आपण या खासदाराच्या विरोधात जालना लोकसभा निवडणूक लढवू, असे म्हणून आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटले होते. मात्र, दोन दिवसांपासून काहीच भूमिका स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांना विचारणा होऊ लागली.

आमदार बच्चू कडू

By

Published : Mar 30, 2019, 10:25 PM IST

जालना - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आज ही माहिती दिली. बच्चू कडू या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.

आमदार बच्चू कडू पत्रकार परिषद


भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हटले, तेव्हापासून आपण या खासदाराच्या विरोधात जालना लोकसभा निवडणूक लढवू, असे म्हणून आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटले होते.
मागील आठ दिवसांपर्यंत आपण निवडणूक लढणार, म्हणणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी ४ दिवसांपूर्वीच घेतलेल्या मेळाव्यात आपण २८ तारखेला भूमिका स्पष्ट करू असे सांगितले. मात्र, दोन दिवसांपासून काहीच भूमिका स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांना विचारणा होऊ लागली. त्यामुळे आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्षांनी जालना येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदार कडू निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले.


हे सांगत असताना पुढील भूमिका मात्र, त्यांनी स्पष्ट केली नाही. कोणाला पाठिंबा देणार? कोणाच्या विरोधात लढणार, हेही त्यांनी सांगितले नाही. आपण भाजपच्या विरोधात लढू आणि प्रचार करू एवढेच सांगितले. मात्र, भाजपच्या विरोधात लढताना आणि स्वतःचा उमेदवार नसताना कोणत्यातरी पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणे गरजेचे आहे. असे असतानादेखील आपण कोणाला पाठिंबा देणार आहोत, ही भूमिका देखील या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केली नाही. येत्या ८ तारखेला आपण कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत ते जाहीर करू, असे सांगून वेळ मारून नेली.


दरम्यान, बच्चू कडू निवडणूक लढण्याच्या मतावर ठाम होते. मात्र, अर्जुन खोतकर यांनी वारंवार ,"मी खासदार दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे सांगितल्याने आमच्या पक्षाने तयारी केली नाही, असेही जिल्हाध्यक्षांनी सांगितले. पत्रकार परिषदेला औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुधाकर विश्वनाथ शिंदे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष नारायण गजर, प्रभाकर भुसारे, बाळासाहेब भोसले, आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details