जालना- विधानसभा निवडणुकीचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. प्रचाराने रंगत गाठलेली असून प्रशासनानेही मतदानाची संपूर्ण तयारी करत असून बदनापूर विधानसभा मतदारसंघात 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान मतदार जनजागृतीपर कार्यक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे उद्दीष्ट ठरवले आहे.
बदनापूर, अंबड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सोमवारी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी व सहनिवडणूक निर्णय अधिकारी छाया पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची संपूर्ण तयारी केलेली आहे. या अंतर्गत मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, नामनिर्देशनपत्रे भरणे, छाणणी, चिन्हे वाटप, साहित्य कक्ष, स्ट्राँग रूम उभारून मतमोजणीचे प्रशिक्षण व मतमोजणीची तयारी आदी निवडणुकीचे रूटीन कामे पूर्ण झाली आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निऱ्हाळी यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विधानसभा मतदारसंघात 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान मतदानाची जागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम राबविले.
या कार्यक्रमाअंतर्गत बदनापूर विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळेत 1 ऑक्टोबरला संकल्प पत्रांचे वाटप करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते ते घरी पालकांना द्यायचे सांगितले. तसेच 3 ऑक्टोबरला शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 4 ऑक्टोबरला शाळा स्तरावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. 7 ऑक्टोबरला चुनाव पाठशाळा राबवण्यात आली. 9 ऑक्टोबरला घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. 10 ऑक्टोबरला महिला शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व महिला बचत गट यांच्या वतीने गाव पातळीवर मतदान जनजागृतीसाठी महिला मेळावे घेण्यात आले. 14 ऑक्टोबरला मतदान जनजागृतीपर पथनाट्य गावपातळीवर सादर करण्यात आले. 15 ऑक्टोबरला मतदानाचा टक्का कसा वाढवावा यासाठी शालेय स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 16 ऑक्टोबरला मतदारसंघातील प्रत्येक शाळोत शिक्षक, विद्यार्थी, गावातील कर्मचारी, पोलिस पाटील, समाजसेवक, सेवाभावी संस्था, बचतगट, व्यापारी उद्योजक या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक गावात महारॅलीचे आयोजन करण्यात येऊन मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आल्या. 17 ऑक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत सामूहिक मतदान प्रतिज्ञा वाचन करण्यात आले.