जालना -शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे सध्या सर्वत्र चर्चेत असलेले केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांचा ससेमिरा टाळला आणि जालन्यातील कार्यक्रम आटोपून थेट भोकरदनकडे रवाना झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी
जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयांमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता. त्यानुसार आज सकाळपासूनच पत्रकारांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी चकरा मारणे सुरु केले होते.
शेवटी साडेतीन वाजता कार्यक्रम झाला. यानंतर शाळेच्या प्रांगणातच खासदार दानवे यांना पत्रकारांनी घेरले. तेव्हा त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी नको म्हणून गेटच्या बाहेर वाईट देतो असे सांगितलं. पत्रकारांनी पुन्हा गेटच्या बाहेर त्यांना घेरले. त्यानंतर तुम्हाला बाईट देतो म्हटलं, तरी तुम्ही ऐकत नाहीत, असे म्हणत, गाडीमध्ये बसून सरळ भोकरदनकडे रवाना झाले. एकंदरीत एरवी नेहमी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणारे खासदार दानवे यांनी मात्र आज पत्रकारांना बोलणे टाळले.