जालना -कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात नागरिकांच्या मदतीसाठी विविध स्वयंसेवी संस्था धावून येत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा केला जातो तर काही जण गरजुंना अन्नधान्य देत असल्याचेही आपण पाहिले असेलच. लहान रस्ते असलेल्या ठिकाणी तसेच गल्लीबोळात रुग्णवाहिका पोहोचत नाही. ही अडचण लक्षात घेत जालन्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'ऑटो अॅम्बुलन्स' हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे ते प्रत्येक फेरीसाठी चारशे रुपये दर आकारत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आठ लिटर क्षमतेचे एक ऑक्सिजन सिलिंडरही आहे. पण, ऑक्सिजनचा वापर केल्यास साडेचारशे रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत.
शहरांमध्ये दहा रिक्षा चालक यासाठी काम करत आहेत. ज्यांना फोन केल्यानंतर काही वेळातच ते संबंधितांच्या दारात हजर होणार आहेत. ही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी राजपाल पारचा व दिनेश बरलो या दोन समन्वयकांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. ऑटोचालक किंवा या दोघांना फोन केल्यानंतर ऑटो अंबुलन्स संबंधित रुग्णाच्या दारात जाऊन उभी राहते आणि या रुग्णाला पाहिजे तिथे, पाहिजे त्यावेळी ही सेवा पुरविली जाते. घर ते दवाखाना, दवाखाना ते पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजी ते पुन्हा दवाखाना शेवटी पुन्हा घर, असे कुठेही कितीही वेळ ते थांबतात. यासाठी ते चारशे रुपये आकारतात. रिक्षा चालकांसाठी पीपीई किट, मास्क व इतर साहित्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दिले जात आहे. या रिक्षामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी आठ लिटरचे छोटे ऑक्सीजन सिलिंडरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जेणेकरून रुग्ण घरापासून रुग्णालयापर्यंत सुस्थितीत जाऊ शकेल या ऑक्सीजन सिलिंडरचे साडे चारशे रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत.
हे आहेत जिगरबाज ऑटोचालक