जालना -येथील औरंगाबाद जालना महामार्गावर परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील डांबराचा थर निघून जाऊन ४-४ फूट रूंद व २ ते ४ फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून ऐन दिवाळीत प्रवाशांची लगबग असताना वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे. या ट्रॅफिक जॅममुळे वाहनांच्या जागोजागी २-२ किमीच्या रांगा लागत आहेत.
ऐन दिवाळीत परतीच्या पावसामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून जालना ते बदनापूर २० किमीच्या अंतराला या खड्ड्यांमुळे १ ते २ तास लागत आहे. या महामार्गाची देखभाल व दुरुस्ती टोलवेज कंपनीकडे आहे. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची दूरवस्था झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. तर, अनेक चारचाकी गाड्यांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे.
हेही वाचा -भिंगीच्या स्मशानभूमीत जादूटोण्याच्या संशयाने ग्रामस्थ भयभीत
जालना-औरंगाबाद टोलवेज कंपनी जालना ते औरंगाबाद या ४ पदरी रस्त्यावर २ ठिकाणी टोल जमा करते. असे असतानाही या रस्त्याचे मजबुतीकरण नसल्याचेच परतीच्या पावसाने दाखवून दिले आहे. या संपूर्ण महामार्गाच्या दोन्ही चारही पदरावरील रस्त्यावर पावसाने ४ ते ५ फूट रूंद व २ ते ४ फूट खोल खोल खड्डे पडलेले आहेत. तर, पावसाचे पाणी त्या खड्डयात तुंबत असल्यामुळे मोटारसायकलस्वार त्यात जाऊन पडण्याच्या घटना घडत असतानाच चारचाकी वाहनांचेही ऑईल चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. या खड्डयांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन ठिकठिकाणी वाहतूक जॅम होत आहे.