जालना- जुना जालना भागातील गांधीचमन परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला आहे. एका व्यक्तीने 15 तारखेला सकाळी बँकेमध्ये प्रवेश करुन तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे आज दिवसभर बँक बंद ठेवण्यात आली.
एसबीआय बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला दिनांक 12 जुलैच्या संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बँकेतील सर्व कर्मचारी काम संपल्यानंतर बँक बंद करून आपापल्या घरी गेले होते. त्यानंतर दिनांक 13 आणि 14 असे सलग दोन दिवस बँकेला सुट्टी होती. आज दिनांक 15 रोजी बँकेचे मॅनेजर संदीप राजदेव आणि गार्ड भामरे हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बँकेत आले. त्यावेळी त्यांना शटरचे आणि चॅनल गेटचे कुलूप तुटले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता, एक व्यक्ती आज (सोमवारी) सकाळी पावणे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान बँकेमध्ये फिरत असताना दिसली. त्याच सोबत त्याने तिजोरी फोडण्याचाही प्रयत्न केला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. याप्रकरणी या बँकेचे लेखापाल मोहित अश्विनकुमार यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कलम 457 ,380, 511, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.