जालना- पिस्तुलाचा धाक दाखवून एका उद्योगपतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरात समोर आली आहे. बांधकाम स्टील उद्योजक राजेश भगवनादास सोनी असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो सोनी यांच्या धाडसामुळे हा प्रयत्न फसला आहे. खंडणीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उद्योगपतीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला असा घडला प्रकार -
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये राजेश भगवानदास सोनी यांचा लोखंडी सळई निर्मितीचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास राजेश सोनी हे दत्त आश्रमामध्ये दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत आल्यानंतर बाहेर एक पांढर्या रंगाची चार चाकी उभी दिसली. या गाडीतून एक जण खाली उतरून सोनी यांना गाडीत बसण्यासाठी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकवू लागला. मात्र सोनी यांनी त्यांना विरोध करून, "मला गोळी मारा, मात्र गाडीत बसणार नाही" असे म्हटले आणि यामध्ये थोडावेळ संभाषण झाले. त्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला .
ओरोपींचा चेहरा पाहता आला नाही-
भोकरदन नाका, मोंढा रोड कडून दत्त मंदिराकडे जात असताना राजेश सोनी यांना कोणीतरी पाठलाग करत असल्याचे जाणवले होते. त्यामुळे त्यांनी कन्हैया नगर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर पाठीमागून येणाऱ्या या चार चाकीला पुढे जाण्यासाठी रस्ताही करून दिला होता. त्यानंतर ती चारचाकी पुन्हा दत्त आश्रमाजवळ आली. मात्र त्याकारवर कोणत्याही प्रकारचा नंबर उपलब्ध नव्हता. तसेच ज्या आरोपींनी सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवला त्यांच्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. तसेच गाडीलाही काळ्या काचा असल्यामुळे आरोपींचे चेहरे पाहता आले नाहीत.
खंडणीचा प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय-
राजेश सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीमध्ये बसवण्याचा जो प्रयत्न केला गेला, तो खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. कारण जर सोनी यांना जिवंत मारायचे असते तर आरोपींनी सोनी यांना गाडीत बसविण्यासाठी धाक दाखविला नसता, गोळी झाडली असती. परंतु आरोपींना सोनी यांचे अपहरण करून खंडणी मागायचा उद्देश असू शकतो? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दत्त मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणि रस्त्यावरील अन्य काही ठिकाणच्या फुटेजमध्ये या आरोपींची गाडी दिसत आहे. त्यावरून जालना पोलीस कामाला लागले आहेत. या घटनेनंतर राजेश भगवांदास सोनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.