जालना - सावकाराकडून होत असलेल्या त्रासाबद्दल पोलीस प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही त्याचा उपयोग न होता उलट पोलिसांकडूनही पुन्हा त्रास सुरू झाल्याने एका शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विलास लासीराम राठोड (वय 40) असे या शेतकऱ्याचेनाव असून तोजालना तालुक्यातील पाथरूड येथील रहिवासी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे,पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, यांची आढावा बैठक सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच घडल्याने सर्वच हबकले.
खुद्द आरोग्यमंत्रीच तिथे उपस्थित असल्याने मोठा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे पोलिसांनी लागलीच त्या शेतकऱ्याला शासकीय रुग्णालयात भरती केले. विलास लासी राम राठोड यांच्या वडिलांनी 1990मध्ये ही जमीन खरेदी केली होती. त्यानंतर घरच्या अडचणीमुळे या जमिनीचा फेरफार घेणे बाकी होते. घरच्या आर्थिक अडचणींमुळे आणि लग्नकार्यामुळे यापैकी काही जमीन खासगी सावकाराकडे गहाण ठेवून शेकडा पाच रुपये व्याजाने रक्कम घेतली. या रकमेची परतफेड केल्यानंतरही तो सावकार ही जमीन परत देण्यास तयार नव्हता.