जालना - एटीएम फोडून त्यामधील रोख रक्कम पळविण्याच्या भानगडीत न पडता चोरट्यांनी पूर्ण एटीएमच पळविल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास जालन्यात घडली. जालना-औरंगाबाद मुख्य महामार्गावर नागेवाडी येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेच्या समोरच या बँकेचे एटीएम आहे.
हेही वाचा -४ कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपींना बेड्या, कोटक महिंद्रा एटीएम व्हॅन प्रकरण
चॅनल मॅनेजरच्या फोनमुळे कळली घटना
एटीएमचे काम पाहणारे एटीएम चॅनल मॅनेजर भगवान काकडे यांना सीसीटीव्ही मॉनिटरिंग कक्षामधून आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एटीएम कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कोणीतरी स्प्रे मारत असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी नागेवाडी शाखेचे व्यवस्थापक संतोष नागरत्न अय्यर यांना तातडीने फोन करून ही माहिती दिली. अय्यर लगेच एटीएममध्ये दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी हे एटीएमच लांबविले होते. त्यानंतर बँकेचे कॅशियर वीरेंद्र ठोले यांना बोलावून घेऊन एटीएममधील रकमेचा हिशेब करण्यात आला. त्यांनी सोळा लाख रुपयांची ताजी भरणा केलेली रक्कम आणि पूर्वीची 14 लाख 47 हजार 600 रुपये एवढी रक्कम त्यामध्ये शिल्लक असल्याचे सांगितले.
या प्रकरणी शाखेचे व्यवस्थापक संतोष अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार लाख रुपये किमतीचे जुने एटीएम आणि रोख रक्कम असा एकूण 32 लाख 67 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -पैठणमध्ये इंडिया बँकेचे एटीएम मशीन गायब... पहाटेच्या अंधारात 'डाव'