जालना- बदनापूर तालुक्यातील दरेगाव येथील रोपवन क्षेत्रात अटल घन वन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अवघ्या तीन महिन्यातच या प्रकल्पांतर्गत लावलेल्या झाडांची उंची १० ते १५ फुटापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे, मुरमाड जमिनीवर देखील एक सुंदर प्रकल्प नावरुपाला आला आहे. १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आज सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांच्या हस्ते या अटल घन वनाचे उद्घाटन करण्यात आले.
माहिती देताना सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार बदनापूर वन परिमंडळ अंतर्गत दरेगाव रोपवन येथे साडेचार हजार चौरस मीटर क्षेत्रावर १३ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. १ जुलै ते १८ जुलै २०२० दरम्यान लागवड केलेल्या या रोपांची उंची अवघ्या ३ महिन्यात १० ते १५ फुटांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे, हा परिसर निसर्गरम्य दिसत आहे.
पुढील वर्षी या वनामध्ये पशुपक्षी फिरकताना दिसतील आणि जालनेकरांसाठी हा प्रकल्प खरोखरच एक वरदान ठरणार आहे. एवढेच नव्हे तर, वन कर्मचाऱ्यांनी देखील निसर्गाची सेवा करण्यासाठी आपल्याला मिळालेली ही एक संधी आहे. तिचे सोने करावे, असे आवाहन पुष्पा पवार यांनी केले. याप्रसंगी वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांनी वनांमुळे वन्यप्राण्यांना होणारे फायदे आणि वन्यप्राण्यांमुळे मानवाला होणारे फायदे, या विषयी माहिती दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड, बदनापूरचे वनपाल कैलास पचलोरे, भोकरदनचे वनपाल राठोड, मार्गदर्शक म्हणून वन्यजीव छायाचित्रकार व वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम आणि मधुकर गायकवाड उपस्थित होते.
हेही वाचा-'आयपीएल'वर सट्टा : दोघेजण पोलिसांच्या ताब्यात; जालन्यातील प्रकार