महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 21, 2020, 11:48 AM IST

ETV Bharat / state

हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह नाईक निलंबित

जालन्याचे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांना निलंबित केले. मारोती शेळके(सहायक पोलीस निरीक्षक ) व पी. आर. चव्हाण (पोलीस नाईक) यांच्यावर अवैध धंद्यांना अभय देणे आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Police
पोलीस

जालना - भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांना निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी ही कारवाई केली आहे. वाळू वाहनांवर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थामार्फत पैसे घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.

मारोती शेळके(सहायक पोलीस निरीक्षक ) व पी. आर. चव्हाण (पोलीस नाईक) अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. मंगळवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके व कर्मचारी पी. आर. चव्हाण यांनी ४ मे रोजी राजूर येथे गोपाल नारायण सांगळे यांच्या वाळू वाहनावर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थ बद्री मिसाळ याच्यामार्फत ५० हजार रुपये घेतले.

त्यानंतर या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी चौकशी करुन अहवाल सादर केला. या अहवालानुसार १९ मे रोजी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी अवैध धंद्यांना अभय देणे आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवून एम. एन. शेळके व पी. आर,चव्हाण यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांना जालना येथील पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी कर्तव्यात कसूर करणाऱया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर धडक कारवाईचे सत्र हाती घेतले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details