जालना - महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या अस्मिता योजनेअंतर्गत मराठवाड्यातील पहिली सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन जालना जिल्ह्यातील गुंडेवाडी येथे १६ ऑक्टोबर २०१८ ला बसविण्यात आली. गेल्या ६ महिन्यांपासून या मशिनचा गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींना चांगला फायदा होत असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.
अस्मिता योजनेचा महिलांना होतोय फायदा
गुंडेवाडी या गावच्या ग्रामसेविका अनन्या भालके आणि गावच्या सरपंच पंचफुला बबनराव गजर यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला या मशीन विषयी तर्क-वितर्क लावले जात होते.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आज मंगळवार २८ मे रोजी अस्मिता योजनेविषयी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. मात्र पूर्वी बसविलेल्या व्हेंडिग मशिनची काय परिस्थिती आहे याविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न केला. १६ ऑक्टोबर २०१८ मध्ये जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशीन बसविण्यात आली. अभिनेत्री निशिगंधा वाड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, तसेच त्यांच्या पत्नी सीमा खोतकर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतमध्ये ही व्हेंडिग मशीन बसविण्यात आली.
या गावच्या ग्रामसेविका अनन्या भालके आणि गावच्या सरपंच पंचफुला बबनराव गजर यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला या मशीन विषयी तर्क-वितर्क लावले जात होते. परंतु उपस्थित मान्यवरांनी या मशीन विषयीचे महत्व आणि आपल्या शरीराशी जोडलेले आरोग्य याविषयी महिलांना मार्गदर्शन केल्यामुळे आज या गावांमध्ये गेल्या वर्षभरात हजारो सॅनिटरी नॅपकिन वापरले असल्याची माहिती मिळाली आहे. याविषयी गावांमध्ये महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये चांगली जनजागृती झाली असल्याने याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर होत असल्याचेही ही महिलांनी सांगितले.