जालना- भाजपाची सत्ता आल्यानंतर घुसखोरांना घरात घुसून बाहेर काढू. हा भाजपचा जाहीरनामा आहे. तसेच मोदी सरकारने सर्वात मोठे केलेले काम म्हणजे देशाला सुरक्षितता दिली आहे. असे असताना राहुल बाबा पाकिस्तान सोबत इलू-इलू करीत आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी जालना येथे केली. जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
पुन्हा सत्ता आल्यावर घुसखोरांना घरात घुसून बाहेर काढणार - अमित शहा - congress
आमचे सरकार घुसखोरांना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा देत मोदी सरकार हे सैन्याचे सरकार असल्याचे ते म्हणाले.

आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचला. त्याचसोबत विरोधी पक्षांवरही कडाडून टीका केली. काँग्रेसकडून देशात ५५ वर्षात गरिबी हटवली गेली नाही. हेच काम मोदींनी 55 महिन्यात करून दाखविले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या काळात राबवल्या गेलेल्या सर्व योजनांचा पाढा वाचून दाखवला. शरद पवार यांच्यावरही टीक करत, ते आम्हाला विचार हिशोब विचारत आहेत तर त्यांनी त्यांच्या काळातील हिशोब जनतेला द्यावा, असे आव्हाहनही शहांनी पवारांना केले.
पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख करत काँग्रेसला पाकिस्तानबद्दल सहानुभुती असल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे सरकार घुसखोरांना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा देत मोदी सरकार हे सैन्याचे सरकार असल्याचे ते म्हणाले. काश्मीर मुद्द्यावर बोलताना त्यांनी ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. या सर्वांना दहशतवाद्यांबद्दल सहानुभुती असल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माधवी नाईक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपाचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.