जालना - जिल्ह्यात सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहेत, मात्र खाजगी शिकवण्या अद्यापपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता शाळा सुरू होण्याचे दिवस आहेत आणि या शिकवण्यात देखील सुरू करणे गरजेचे आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी शिकवण्या सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी कोचींग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र यांच्यावतीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
खाजगी शिकवण्या सुरू करण्यास परवानगी द्या; कोचींग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्रची मागणी सोळा महिन्यांपासून क्लासेस बंद -
कोरोनामुळे गेल्या सोळा महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. त्यामुळे संचालकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. क्लासेसचे भाडे, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे मानधन हे सर्व चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता क्लासेस सुरू झाले नाही तर हा सर्व डोलारा कोसळेल अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. यासोबत कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना मुद्रा लोन द्यावे, क्लासेसचा समावेश सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगात करावा, कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना दिनांक १ एप्रिल 2020 पासून ते क्लासेस पूर्ववत सुरू होईपर्यंत संचालकांना 40 हजार रुपये तर शिकवणी घेणार्या शिक्षकांना वीस हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात यावे. तर १२ तारखेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही तर १४ तारखेपासून महाराष्ट्रात सर्वत्र क्लासेस सुरू करण्यात येतील. असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
कोचींग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कारभारी सपाटे, प्राध्यापक विठ्ठल गाडेकर, योगेश घोगरे प्राध्यापक भागवत, प्राध्यापक दीपक पवार, दिनेश व्यवहारे, कचोर चरणसिंग यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - जालन्यातील व्यापाऱ्याची 46 लाखांना फसवणूक; गुजरातमधून दोघांना अटक