जालना- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, या दृष्टीने नियोजन करणे. तसेच इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत आहे. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत आहे. तसेच रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. तसेच कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
रुग्णांना उत्तम दर्जाचे जेवण द्यावे
कोरोनाबाधित अथवा संशयित रुणांना कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना उत्तम दर्जाचे जेवण द्यावे, रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवणे, नियमितपणे रुग्णांची तपासणी करणे, रुग्णांची कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने अधिकच्या 250 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात येत आहे. हे बेड रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध होतील, यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तसेच डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांना प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्बंध व सुचनांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होईल, यासाठी पोलीस विभागाने काम करणे, कंन्टेन्टमेंट झोनमध्ये निर्बंधाची अधिक कडकपणे अंमलबाजवणी करण्याबरोबरच मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहे.