जालना- जिल्हात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिकठिकाणी मराठा आंदोलने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असल्याची माहिती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने- नरेंद्र पाटील आंदोलकांची तब्येत ढासाळली
अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या ग्रामीण भागातून मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा लढा सुरू झाला आहे. २० जानेवारीपासून सुरु झालेल्या या आंदोलनादरम्यान चार आंदोलकांची तब्येत ढासळली होती. त्यामुळे त्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. आता बीड जिल्ह्यातील मालेगाव येथेही मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
मराठा समाजाची वाईट परिस्थिती
फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, आघाडी सरकार आल्यानंतर सगळेच उलटे झाले. मराठा समाजाला चांगल्या सुविधा, सवलती देण्याच्या दुष्टिकोनातून आघाडी सरकारने उपाययोजना करायला हव्या होत्या मात्र, तसे काहीही झालेले दिसून येत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. आरक्षणाचा तिडा अजून न सुटल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. एकंदरीत मराठा समाजाची आज वाईट परिस्थिती असल्याचेही पाटील म्हणाले.
नेत्यांनी एकत्र यावे
मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे ,छत्रपती संभाजीराजे भोसले ,उदयनराजे भोसले आणि सर्व मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र यायला पाहिजे. आणि एससीबीस मधून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही पाटील म्हणाले.