जालना - महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत 672 कोटी 57 लाख 99 हजार 396 रुपये खातेदारांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र, अजूनही सुमारे सहा हजार खातेदार या योजनेपासून वंचित आहेत. त्यामध्ये अनेक जणांचे बोटांचे ठसे उमटले नसल्यामुळे, काहीजण मयत झाल्यामुळे तर काहींचे आधार क्रमांक चुकल्यामुळे या तक्रारी येत आहेत.
यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. या शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता जिल्हा उपनिबंधकांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावर उपाययोजना केली आहे. तसेच या येणाऱ्या अडचणींवर पर्याय देखील त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढले नाही, त्यांचे नाव यादीमध्ये येणारच नाही आणि घरी आले असेल तरीदेखील आधार क्रमांकाशिवाय सातबारा कोरा होत नसेल तर अजूनही त्यांनी आधार कार्ड काढून बँकेमध्ये जमा करावे, हा पर्याय त्यावर उपलब्ध आहे. एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज असेल आणि ते मयत झाले असतील, तर त्यावर देखील पर्याय आहे. संबंधिताने त्या बँकेत जाऊन वारसा हक्काचे प्रमाणपत्र सादर करावे जेणेकरून त्यांच्या नावावरील कर्ज कमी होऊन जाईल, अशी सर्व उपाययोजना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा -काम न करता शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - अजित पवार
जालना जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 1 लाख 30 हजार 158 खातेदारांची यादी आली होती. त्यापैकी 1लाख 5 हजार 637 खात्यांचे आधार प्रमाणीत झाले. यापैकी 99 हजार 396 खातेदारांच्या खात्यावर 672 कोटी 57 लाख रुपये जमा झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली.