जालना- देशासह राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी राज्यातील पोलीस, आरोग्य सेवक व प्रशासकीय यंत्रणा संयुक्तपणे अहोरात्र काम करत आहेत. नुकताच याचा प्रत्यय आला आहे. बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील ढाकणे दांपत्य हे आरोग्य सेवेत कार्यरत आहे. त्यांनी आपल्या ३ वर्षाच्या मुलाला त्याच्या आजोबाकडे सोडले असून आपले कर्तव्य बजावत आहेत.
कंडारी येथे मागील २० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असलेले जगन्नाथ ढाकणे यांचा मुलगा रामप्रसाद ढाकणे व सून दिपाली ढाकणे हे पुणे येथे आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. रामप्रसाद हे पुणे येथील वेलस्प्रिंग रुग्णालयात आरोग्य सेवा बजावतात तर त्यांची पत्नी दिपाली या पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात आरोग्य सेवेत आहेत. दीड महिन्यांपूर्वीच जेव्हा पुणे येथे पहिला कोरोना रुग्ण सापडला तेव्हापासून ढाकणे दांपत्य केारोना रुग्ण सेवेत रुजू झालेले आहेत.