जालना- खामगाव रेल्वे सुरू होण्यासाठी जालना जिल्ह्यात उपयुक्त वातावरण असल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी दिली.
रेल्वेला अपेक्षित माल होईल उपलब्ध
5 जानेवारीपासून जालना ते खामगाव रेल्वेचे सर्वेक्षण करणारे पथक जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. मंगळवारी (दि.6 जाने.) दुसऱ्या दिवशी या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी कृषी समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांच्याकडून मालाच्या आवक-जावक विषयी माहिती घेतली. यावेळी मोंढ्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत सर्वेक्षण पथकाचे प्रमुख सुरेश जैन यांनी रेल्वे सुरू करण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे. तसेच रेल्वेला अपेक्षित असणारा माल वाहतुकीसाठी येथे उपलब्ध होईल, असेही सांगितले आहे. त्यामुळे जालना खामगाव रेल्वे मार्ग सुरू होणे आता निश्चित झाले असल्याचेही माजी मंत्री खोतकर यांनी सांगितले .