जालना -आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि बचाव कार्य याविषयी जनजागृती आणि प्राथमिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल (एनडीआरएफ) हे बुधवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यातच जालन्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खदानीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह काढण्यात यश आले. ही घटना बुधवारी घडली.
भोकरदन तालुक्यातील तीन तरुण चार चाकी वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आले होते, सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासमोर कागदपत्रांवर सही करण्यासाठी ते गेले. मात्र, अधिकाऱ्याला काहीतरी वेगळाच वास आल्यामुळे त्यांनी हे काम थांबविले. दरम्यानच्या काळात या तरुणांनी बाजूलाच असलेल्या खदानीमध्ये आंघोळ करून येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी हे तिघे जण कपडे काढून खदानीमध्ये उतरले पण दोनच जण बाहेर आले, एक मात्र आलाच नाही. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली, खदानीच्या बाजूला असलेल्या टेकडीवर मुरूम भरणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी देखील आरडाओरड सुरू करून चंदनजिरा पोलिसांना फोन केला. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या तरुणाचा शोध घेण्यासाठी जालना नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने रात्री दहा वाजेपर्यंत शोधमोहीम चालू होती. शेवटी हतबल होऊन हे सर्च ऑपरेशन थांबविले.