जालना- बियाण्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरात भाजीपाल्यांच्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये 500 प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश आहेत.
देश-विदेशातही पिकणाऱ्या विविध भाजीपाल्यांचे प्रकार कलश सीड्समध्ये पाहायला मिळत आहेत. जगातील सर्वात तिखट मिरची कोणती? भाजीपाला निर्यातीसाठी काय करावे, याविषयी प्रदर्शनात मार्गदर्शन करण्यात येत आहे. काही भाजीपाल्यांच्या बियाण्यांचे देशात उत्पादन होते. मात्र, विदेशात भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. भेंडीच्या आकारात असलेले मक्याचे कणीसदेखील येथे उपलब्ध आहे. जे परदेशामध्ये उकडून पूर्णच खाल्ले जाते. लोप पावत चाललेले ग्रामीण भागातील आणि ज्वारीच्या शेतात मोठ्या प्रमाणात येत असलेले वाळूक (शेंनी)हेदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.
बाराही महिने फुले येणाऱ्या झेंडूचे बियाणेदेखील येथे ठेवण्यात आले आहे. राज्यभराच्या विविध कानाकोपर्यातून हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकरी येथे आले आहेत. भाजीपाल्यांच्या माध्यमातून साकारलेली आरास हे एक वैशिष्ट्य इथे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-नागपूर शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सरसावले कलावंतांचे हात
याबाबत माहिती देताना कलश सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर अग्रवाल म्हणाले की, आजच्या पीक पाहणी प्रदर्शनांमध्ये भाजीपाल्यांच्या विविध विकसित केलेल्या नवीन प्रजाती विषयी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. उत्पादन वाढ करून त्यामधून खात्रीशीर उत्पादन कसे मिळेल, याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दिलेल्या माहितीतून शेतकरी कोणते बियाणे निवडायचे हे ठरवू शकणार आहेत.
हेही वाचा-पंतप्रधान 23 जानेवारीला पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौर्यावर
देश-विदेशातील शेतकऱ्यांचा सोशल मीडियातून प्रदर्शनात सहभाग-
प्रदर्शन पाहण्यासाठी जम्मू-काश्मीर, हिमाचल, पंजाब गुजरात येथील शेतकरी येत आहेत. त्यासोबत कलश सीड्स बियाणे जगभरातील 40 ते 50 देशांमध्ये पाठविले जाते. तेथील हवामानानुसार या बियाण्यांचे संशोधन करून उत्पादन घेतले जाते. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे विदेशातून येणारे पाहुणे येऊ शकले नाहीत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना तिथे बसून हे प्रदर्शन पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फायदा आफ्रिका व आशिया खंडातील काही देशांमधील शेतकरी घेत असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.