रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक यांची प्रतिक्रिया जालना : जालना तालुक्यातील जामवाडी पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला होता. यावेळी दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून 32 हजारांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पाचही दरोडोखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पाच दरोडेखोरांनी केली लूट : जामवाडीजवळील इंडियन पेट्रोल पंपाजवळ रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे, दरोडेखोर चेहऱ्याभोवती कापड बांधून आले होते. दरोडा टाकताना एकूण पाच दरोडेखोर मॅनेजरच्या केबिनमध्ये घुसले. त्यांनी मॅनेजरला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड पळवली. तसेच या पाच दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला मारहाण देखील केली आहे. एकाने तर मॅनेजच्या अंगावर स्टूल फेकला आहे.
घटनास्थळी गुन्हे शाखेची धाव : दरोडेखोरांनी केबिनची झाडाझडती घेतली. त्यानेळी त्यांनी मॅनेजरकडून जबरदस्तीने 32 हजार रुपये काढून घेतले. मात्र, पैसे अधिक न मिळाल्याने दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला मारहाण केली. त्यानंतर सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
काही संशयित ताब्यात : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दरोडेखोरांच्या ताब्यातून 1 एअर पिस्टल, 2 खंजीर, 3 मोबाईल, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर गुन्ह्याचा शोध पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक बोंडले, सम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विलास गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, कैलास शेळके, योगेश सहाने, धीरज भोसले यांनी केला आहे.