भोकरदन (जालना) -तालुक्यातील जळगाव सपकाळ गावातील जावई औरंगाबाद येथे आरोग्य तपासणीसाठी गेल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या सासुरवाडीतील म्हणजेच जळगाव सपकाळ या गावातील तब्बल 40 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जावई औरंगाबादेत कोरोना 'पॉझिटिव्ह', जालना जिल्ह्यातील सासुरवाडीमधील 40 जण 'क्वारंटाईन' - jalna corona positive
गावातील जावयाला कोरोना झाल्याने जळगाव सपकाळ गावातील तब्बल 40 जणांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये रवानगी झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू झाल्यापासून औरंगाबाद येथील रहिवासी तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे राहण्यास आले होते. मात्र, 12 जुलैला ते औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात रक्तदाब व मधुमेह तपासणीसाठी गेले होते. दोन दिवसानंतर त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होऊ लागला. 15 जुलै रोजी त्यांनी कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल दोन-तीन दिवसांनी पॉझिटिव्ह आला. 20 जुलैला याबाबत त्यांच्या सासुरवाडी जळगाव सपकाळ येथे माहिती मिळाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली.
त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या या गावातील तब्बल चाळीस जणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले तर 32 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच गावातील काहीजण कोरोनाबाधित आढळल्याने खबरदारी म्हणून गावात तीन दिवस संचारबंदी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. ही संचारबंदी उद्यापर्यंत (दि. 23 जुलै) असणार आहे, अशी माहिती सरपंच शामकांत सपकाळ यांनी दिली.