जालना- काल रेड झोनमध्ये गेलेला जिल्हा आज पुन्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३ मधील 'सी' तुकडीच्या ५ जवानांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास कोव्हिड-१९ या शासकीय रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सुट्टी मिळालेल्या रुग्णांना टाळ्या वाजवून निरोप दिला.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही १७ आहे. त्यामुळे, जिल्हा काल रेडझोनमध्ये गेला होता. मात्र 'सी' तुकडीतील जवानांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जालनेकरांना दिलासा मिळाला आहे. राज्य राखीव दलाची ही तुकडी मालेगाव येथे गेली होती. त्यानंतर तुकडीतील ५ जवानांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच तुकडीतील इतर जवानांना भोकरदनला देखील विलगीकृत करण्यात आले आहे. त्यांचे देखील अहवाल निगेटिव्ह येतील अशी आशा जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी व्यक्त केली आहे.