जालना - शहर व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. पहिल्या दिवसाच्या या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आज (शनिवारी) दुसऱ्या दिवशी त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शनिवारी नवीन आणि जुना जालना भागातील किरकोळ किराणा दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद होती.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्येला शहरात आणि मोंढ्यात होणारी गर्दी हे कारण असू शकते. असे ग्राह्य धरून ही साखळी तोडण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. शहरात विविध व्यावसायिकांच्या सुमारे 62 संघटना आहेत. या सर्व संघटनांनी या 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदमध्ये दारूची दुकाने खुली आहेत.
आज (शनिवारी) दुपारनंतर अमावस्येला सुरुवात झाली आहे. तसेच उद्या (रविवारी) सूर्यग्रहण आहे. त्यामुळे अनेक व्यापारी या काळात व्यवसाय करणे अनिष्ट समजतात. कृषी उत्पन्न बाजार समितीला दर अमावस्येला सुट्टी असते. त्यामुळे मोंढ्यातील उलाढाल मोठ्या प्रमाणात कमी असते. या सर्व बाबी लक्षात घेता रविवारी बाजारपेठ बंद राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.