जालना- खासगी सावकाराची देणे दिल्यानंतरही संबंधित सावकार आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार माणिकराव नायबराव खंडागळे (रा. नेर तालुका) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दिली होती. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सोमवारी ३ जणांवर मोजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बालू बाबू गिरी, रामेश्वर जिजाभाऊ काकडे, मारुती आश्रुबा जाधव असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
माणिकराव खंडागळे यांनी ६ मे रोजी नेर येथील सिंधुबाई तौर, बालू बाबू गिरी ,विमल शिवाजी गिरी, कौसाबाई आसाराम उफाड, रामेश्वर जिजाभाऊ काकडे ,वंदना प्रभाकर उफाड ,कैलास दिगंबर गिरी, उषा विलास गिरी, चंद्रकला सुरेश उफाड ,आणि आणि राणी अशोक उफाड या अकरा जणांविरुद्ध बेकायदेशीर सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपनिबंधकांनी १७ मे रोजी संबंधित ११ लोकांच्या घरावर नेर येथे छापे टाकले आणि वादग्रस्त कागदपत्रे हाती घेतली होती. या प्रकरणाची चौकशी आणि पूर्ण माहिती हाती आल्यानंतर सोमवार दिनांक २४ मे रोजी ११ पैकी ३ जणांच्या घरामध्ये वादग्रस्त कागदपत्रे सापडल्यामुळे या तीन जणांवर मोजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या चौकशीअंती या प्रकरणांमध्ये या तीन लोकांकडे शेतीच्या रजिस्ट्री आणि विविध नोंदी असलेल्या डायऱ्या आणि धनादेश सापडले. त्यामुळे या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाडीमध्ये बालू बाबू गिरी यांच्या घरी अनेक रजिस्ट्री आणि डायरी सापडली, रामेश्वर जिजाभाऊ काकडे यांच्या घरात तक्रारदाराचा दोन लाख रुपयांचा बँक ऑफ महाराष्ट्रची सही केलेला कोरा धनादेश सापडला. तसेच मारुती आश्रुबा जाधव यांच्या घरातील डायरीमध्ये कोणाला किती रक्कम दिली, किती दिवसासाठी दिली, व किती टक्के व्याजाने दिली याची नोंद असलेली डायरी सापडली. या डायरीमध्ये ५ टक्के ते १० टक्के पर्यंत शेकड्यांनी पैसे दिले असल्याच्या नोंदी आहेत.