जालना- मंठा पोलिसांनी 19 डिसेंबरला धाडसी कारवाई करत ओडिशा राज्यातील कोटिंग येथून खानदेशात चाललेला दोन कोटींचा गांजा पकडला होता. या कारवाईने पोलिसांचे राज्यभर कौतुकही केले गेले. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांचा 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवही करण्यात आला. मात्र, त्या कारवाईचा पुढील तपास अद्याप पुढे सरकला नाही. त्यामुळे जसे या धाडसी कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत होते. तसेच आता या प्रकरणाचा तपास कुठे अडकला? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
'त्या' कारवाईने पोलिसांचे कौतुक झाले.. मात्र पुढील तपास मंदच - जालना बातमी
19 डिसेंबरला मध्यरात्री पोलिसांनी अवैध गांजा घेउन जाणारा ट्रक पकडला. ट्रकमध्ये तपासणी केली असता केमिकलने भरलेल्या पोत्यांच्या आतमध्ये गांजा भरलेला दिसून आला. यात चार क्विंटल गांजा होता.
19 डिसेंबरला मध्यरात्री पोलिसांनी अवैध गांजा घेऊन जाणारा ट्रक (एम एच 20 डीई 6777) पकडला. ट्रकमध्ये तपासणी केली असता, केमिकलने भरलेल्या पोत्यांच्या आतमध्ये गांजा भरलेला दिसून आला. यात चार क्विंटल गांजा होता. ज्यांची बाजार भावाने सुमारे दोन कोटी किंमत आहे. तसेच पंधरा लाखांचा ट्रक, असा एकूण दोन कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन ट्रक चालकालाही पकडले होते.
हा गांजा आजही मंठा पोलीस ठाण्याच्या खोलीमध्ये पडून आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश येईपर्यंत जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावता येत नाही. मुद्देमाल, ट्रक चालक तथा मालक पोलिसांच्या ताब्यात असतानाही हा तपास पुढे सरकत नसल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली. मात्र, पोलीस निरीक्षक विजय निकम हे तपास सुरू असल्याचे सांगत दोन तपास पथके विविध ठिकाणी जाऊन आली. मात्र, हाती महत्त्वाचे धागेदोरे सापडले नसल्याचे सांगत आहेत.