जालना - माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालय, दानशूर व्यक्ती, देशभक्त अशांकडून 'ध्वजदिन निधी' संकलित केला जातो. शासनाच्या वतीने माजी सैनिक कार्यालयाला हे उद्दिष्टही दिल्या जाते. ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान जालना येथील माजी सैनिक कल्याण कार्यालयाला ३१ लाख ३० हजार ५१२ रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने ४८ लाख ७ हजार रुपये ध्वजदिन निधी संकलित करून हे उद्दिष्ट १५६ टक्के पूर्ण केले आहे. तसेच, ७ डिसेंबर ऐवजी सर्वांच्या सोयीनुसार १३ डिसेंबरला शुक्रवारी जिल्ह्याचा ध्वजदिन साजरा करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी हा ध्वजदिन निधी वापरला जातो. यामध्ये स्वयंरोजगार, मुलींचा विवाह, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, बचत गट, याकरिता या निधीचा वापर होतो. इंग्रजांच्या काळात या दिवसाला "पोपी डे" म्हणत असत. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संरक्षण समितीने याचे नाव बदलून 'ध्वजदिन निधी' असे ठेवले. वर्षभर हा निधी संकलित केला जातो. १ रुपयापासून ते अमर्याद रकमेपर्यंत कोणीही हा निधी जमा करून त्याची रीतसर पावती घेऊ शकतो. या कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी वीरपत्नी लीलावती पंडितराव लहाने, टेंभुर्णी. ता जाफराबाद, वीरपिता केशवराव भिवसन कदम सोमठाणा, ता बदनापुर आणि शौर्य पदक प्राप्त सैनिक भानुदास शिरसाट यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.