जालना -जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत होती. आणि या चोरीचा तपास लावण्यासाठी पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या नाव्हा रोडवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून काल रात्री १३ क्विंटल गौण खनिज जप्त केले आहे.
तालुका पोलिसांची कारवाई
तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांना गौण खनिजाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी काल रात्री त्यांच्या सहकाऱ्यांना नाव्हा रोड जवळून जात असलेल्या समृद्धी महामार्गावर सापळा लावण्यास सांगितले. पोलीस नाईक संदीप उगले यांनी हा सापळा लावला आणि त्यामध्ये एक टेम्पो (क्र. एम ० बीजी ९२९५) गौण खनिज म्हणजेच, गारगोटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
१३ क्विंटल गारगोटी जप्त
टेम्पोत ५ व्यक्ती बसलेले दिसले. या पाचही व्यक्तींना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १३ क्विंटल गारगोटी आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो, असा एकूण सुमारे २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.