जालना -दोन दिवसांपूर्वी दिनांक 20 आणि 21 रोजी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे 12 जनावरांना आपला जीव गमवावा लागला तर जिल्ह्यातील 11 हजार 357 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
गारांचा पाऊस
जिल्ह्यात दिनांक 19 मार्चपासून ढगाळ वातावरण होते. त्यासोबत सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, गारांचा पाऊस ही सर्व अवकाळी पावसाचे लक्षणे घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे अंगावर वीज पडल्यामुळे जिल्ह्यातील बारा जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये जालना तालुक्यातील तीन, बदनापूर एक, भोकरदन चार, जाफराबाद दोन, आणि घनसावंगी दोन अशा एकूण बारा जनावरांचा समावेश आहे.
अवकाळीने बाधित झालेली गावे
जालना तालुका 25, बदनापूर 8, भोकरदन 21, जाफराबाद 6, घनसांगी 19 अशी एकूण 79 गावे या अवकाळीने बाधित झाली आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यात अवकाळीमुळे 4 हजार 935 हेक्टर जिरायती, 4023 बागायती आणि 2399 फळ पिकाची शेती, अशा एकूण 11 हजार 357 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे.
पिके झाली आडवी
शेतात उभी असलेली पिके मोठ्या प्रमाणात आडवी झाली आहेत. गहू आणि ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. भाजीपाल्यामध्ये टोमॅटोचे पीक जमीनदोस्त झाले आहे. गारेच्या मारामुळे टोमॅटो तुटून जमिनीवर पडले आणि फुटले. ज्या भागात अवकाळी पाऊस झाला, त्या भागातील कांद्याचे पीकदेखील भुईसपाट झाले आहे. यासोबत फळ पिकांमध्ये येणाऱ्या अंगुराच्या बागादेखील नष्ट झाल्या आहेत. गारांचा मार लागल्यामुळे अंगुरांवर डाग पडले आहेत. असे डाग पडलेले अंगूर व्यापारी विकत घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना या बागा 10 रुपये किलोप्रमाणे का होईना व्यापाऱ्यांच्या घशात घालाव्या लागत आहेत.
आता विमा मिळविण्यासाठी धडपड
बहुतांश शेतकऱ्यांनी अंगुराच्या बागांचा विमा उतरविला आहे. या विम्यानुसार एक हेक्टर अंगुराच्या बागेला 1 लाख 80 हजार रुपये विमा मिळू शकतो. परंतु किती विमा द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार संबंधित विमा कंपनीला आहेत. त्यामुळे जोपर्यंत विमा कंपनीचे अधिकारी बागेमध्ये येऊन पाहणी करत नाहीत, तोपर्यंत याचा अंदाज लावणेदेखील कठीणच आहे आणि पाहणी केल्यानंतरही जोपर्यंत हा पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना या कार्यालयात चकरा मारण्यासाठी किती पैसा खर्च करावा लागेल याचाही अंदाज नाही.
चार दिवसात 66 मिलिमीटर अवकाळी पाऊस
जालना जिल्ह्यात 19, 20, 21 आणि 22 या चार दिवसांमध्ये 66 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस भोकरदन तालुक्यात झाला आहे.