महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जैश'चे जळगाव कनेक्शन ?; तरुणाच्या धक्कादायक फेसबुक पोस्टने खळबळ - बॉम्बस्फोट

जळगावातील तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती दिली. देशातील ५ शहरात बॉम्बस्फोट करणार असल्याची माहितीही त्याने पोस्टमध्ये नमूद केली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा तपास करत आहेत. ही पोस्ट त्या तरुणानेच अपलोड केली, किंवा त्याचे अकाउंट हॅक करुन दुसरे कोणी ही पोस्ट केली याचा तपास करण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : May 22, 2019, 10:08 PM IST

Updated : May 23, 2019, 3:27 AM IST

जळगाव- मोबाईल रिचार्जच्या नावाखाली नागरिकांकडून ५ कोटी रुपये उकळून पोबारा केलेल्या तरुणाच्या फेसबुक पोस्टने खळबळ उडाली. आपण जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून देशातील ५ शहरात बॉम्बस्फोट करण्याचे नियोजन केल्याचे या तरुणाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान असे त्या तरुणाचे नाव असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.

तरुमाने केलेली फेसबुक पोस्ट


समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (वय ३७, रा. रामनगर) मोबाईलचे काम कारयचा. त्याच्याविरोधात १० जानेवारीला २०१९ ला अमान इरफान अन्सारी या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समीरने मोबाईल रिचार्ज करण्याची वेबसाईट तयार करुन देण्याच्या नावाने तीन वेळा करुन ३४ लाख ९० हजार ६४८ रुपये घेतले. त्या मोबदल्यात वेबसाईट तयार करुन न देता फसवणूक करुन तो बेपत्ता झाल्याचे अमानने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्यात सायबर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


समीरने 'अतीया रिचार्ज' या नावाने तयार केलेल्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवर बुधवारी सकाळी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट झाला. यात समीरने म्हटले आहे, की मी गेल्या काही वर्षांपासून जैश ए मोहम्मद या संघटनेचा सदस्य आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करतोय. आम्ही देशातील पाच मोठ्या शहरांमध्ये सुसाईड बॉम्ब व दारुगोळा पाठवला आहे. पुलवामामध्ये झालेला प्रकार फक्त नमुना होता. पंतप्रधान यांच्यावर देखील हल्ला करणार आहोत. अशा आशयाचा मजकूर त्याच्या फेसबुक वॉलवर पोस्ट झालेला आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सुरक्षा यंत्रणांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार संवेदनशील असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.


दरम्यान, 'अतीया रिचार्ज' या नावाने तयार केलेल्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवरून पोस्ट केलेल्या मजकुराचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण नेमका हा काय प्रकार आहे ? अशी विचारणा करत आहे.

Last Updated : May 23, 2019, 3:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details