महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: कांताई बंधाऱ्यात पत्नीसह मुलांच्या डोळ्यासमोर वाहून गेला तरुण - youth drawn in Kantai canal

पती पाण्यात पडल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. नागरिक मदतीसाठी येण्यापूर्वीच तो पाण्यात दिसेनासा झाला.

बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण
बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण

By

Published : Jul 30, 2020, 8:38 PM IST

जळगाव- शहराजवळ गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण वाहून गेला आहे. ही घटना तरुणाची पत्नी आणि दोन मुलांच्या डोळ्यासमोर गुरुवारी (आज) दुपारी घडली आहे. मुकेश मोरे (वय 22, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेश हा कुटुंबीयांसोबत कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला असताना ही घटना घडली.

मुकेश मोरे हा जैन इरिगेशन कंपनीत एसडब्ल्यूआर इलेक्ट्रिक विभागात गेल्या चार वर्षांपासून नोकरीला आहे. गुरुवारी दुपारी तो विरंगुळा म्हणून पत्नी व दोन मुलांसोबत दुचाकीने कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला. यावेळी त्याच्यासोबत मित्राचे कुटुंबीयदेखील होते. कांताई बंधाऱ्यावर काही वेळ घालवल्यानंतर मुकेश बंधाऱ्यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरला. खोल पाण्यात उडी घेतल्यानंतर पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. त्यानंतर तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. पती पाण्यात पडल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. नागरिक मदतीसाठी येण्यापूर्वीच तरुण पाण्यात दिसेनासा झाला.

अंधारामुळे थांबवले शोधकार्य-

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाळधी येथील जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच सोपान पाटील, पाळधी बुद्रुकचे सरपंच चंद्रकांत पाटील, पाळधी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कांताई बंधाऱ्याच्या पाण्यात पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, उशिरापर्यंत मुकेशचा शोध लागला नाही. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.

पंधरवड्यात बंधाऱ्यात बुडाल्याची दुसरी घटना-

गेल्या पंधरवड्यात कांताई बंधाऱ्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जळगाव शहरातील कांचननगरातील तरुण बंधाऱ्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर बुडून मरण पावला होता. या घटना लक्षात घेऊन कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details