जळगाव - मुलीची छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्याच्या रागातून एका तरुणाचा 3 ते 4 जणांनी चॉपरने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जळगाव शहरातील खेडी परिसरात महामार्गावर घडली. बिपीन दिनकर मोरे (वय ३५, रा. खेडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा -भुसावळ मतदारसंघ : युतीत जागेचा तर आघाडीत उमेदवाराचा तिढा
बिपीन मोरे हा बांधकाम ठेकेदार म्हणून काम करत होता. त्याचा खून अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), त्याचा भाऊ व इतर मित्रांनी केल्याचा आरोप मोरेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मोरे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल तसेच त्याचे भाऊ शंकर व अरुण हे पूर्वी खेडी गावात मोरे यांच्या घराशेजारी राहत होते. त्यावेळी अमोल व त्याचे भाऊ मोरे कुटुंबातील महिला, मुलीची छेड काढत होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात अनेक वेळा वाद झाले होते. दरम्यान, मोरे कुटुंबीयांनी या विषयासंदर्भात एमआयडीसी पोलिसांत अनेकवेळा तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी अमोलसह त्याच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांची हिम्मत वाढत गेली. त्यामुळे मोरे सतत पोलिसात तक्रारी करत होते. या गोष्टीचा राग अमोलच्या मनात होता. या रागातूनच अमोल याने काही साथीदारांच्या मदतीने मोरेचा खून केला, असा मोरे कुटुंबीयांचा आरोप आहे.
- रस्त्यात अडवून चॉपरने केले वार-
शनिवारी सकाळी 9.30 वाजता मोरे हे (एमएच 19 डीएफ 5384) क्रमांकाच्या दुचाकीने खेडी येथील पेट्रोल पंपावर गेले होते. तेथे त्यांनी पेट्रोल भरल्यानंतर ते समोसे घेऊन घरी येणार होते. तत्पूर्वी अमोल व त्याच्या साथीदारांनी त्यांना रस्त्याच्या कडेला अडवले. काही कळण्याच्या आतच त्यांनी मोरेंवर हल्ला चढवला. अमोलने मोरे यांच्यावर चॉपरने 3 वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडूंब; पाणीप्रश्न सुटला
हल्ला केल्यानंतर अमोल साथीदारांसह घटनास्थळावरुन पळून गेला. काही सेकंदातच ही बातमी खेडी गावात पसरली. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोरे यांची ओळख पटवली. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.
- पोलिसांच्या अनास्थेमुळेच मोरेचा बळी-
अमोलवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मोरे कुटुंबीयांना त्याने प्रचंड छळलेले होते. यामुळे त्यांनी अनेकवेळा एमआयडीसी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या. परंतु, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नाही. परिणामी अमोल व त्याच्या कुटुंबीयांची हिंमत वाढत गेली. अखेर त्यांनी मोरे याचा खून केला. पोलिसांच्या अनास्थेमुळेच मोरे याचा बळी गेला आहे, असा आरोप मोरेच्या नातेवाईकांनी केला.
हेही वाचा - जळगाव ग्रामीण मतदारसंघ: घरकुल घोटाळा उघडला अन् दोन 'गुलाबां'चा संघर्ष टळला!