जळगाव - क्षुल्लक कारणावरून एका 36 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास भुसावळ शहरात घडली. विकास साबळे (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी नीलेश ताकटे (रा. जुना सातारा, भुसावळ) नावाच्या संशयित आरोपीस अटक केली आहे.
भुसावळात क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून; आरोपीने धारदार शस्त्राने केले गळ्यावर वार - crime
क्षुल्लक कारणावरून एका 36 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास भुसावळ शहरात घडली.
![भुसावळात क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून; आरोपीने धारदार शस्त्राने केले गळ्यावर वार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4294810-792-4294810-1567198287575.jpg)
मृत विकास साबळे हा रेल्वेत गँगमन म्हणून सेवारत होता. शुक्रवारी रात्री भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकिज परिसरात असलेल्या खान्देश हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत असताना नीलेश आणि विकास यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यात नीलेशने विकासच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या विकासचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपास करत अवघ्या तासाभरात संशयित आरोपी नीलेशच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे भुसावळ शहर हादरले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.