जळगाव - औरंगाबाद महामार्गावर विमानतळासमोर दोन भरधाव दुचाकी एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला. आज (बुधुवार) दुपारी १ वाजता हा अपघात झाला. या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे.
प्रितेश सुरेश रायपुरे (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील विकास चंपालाल बारेला हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत प्रितेश हा तरुण अविवाहित होता. तो शिवाजीनगरातील एका वर्कशॉपमध्ये काम करीत होता. बुधवारी दुपारी तो दुचाकीत (क्रमांक एमएच १९ एवाय ८६२६) पेट्रोल भरण्यासाठी घरातून निघाला होता. प्रितेश हा कुसुंबा गावाकडे निघाला होता. याचवेळी विमानतळासमोरुन विकास बारेला हा तरुण शहराकडे दुचाकीने भरधाव वेगात येत हाेता. विकास व प्रितेश या दोघांच्या दुचाकी एकमेकांना समोरा-समोर धडकल्या. दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्यामुळे या अपघातात प्रितेशचे डोके आणि छातीवर जबर मार लागून तो जागीच ठार झाला. तर विकास हा गंभीर जखमी झाला.