जळगाव- शहरातील औद्योगिक वसाहतीतील पटेल पॅकेजिंग या कंपनीत एका कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रवींद्र बाळू सपकाळे (वय ३०, रा. कठोरा, ता. जळगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
औद्योगिक वसाहतीत व्ही सेक्टरमध्ये पटेल पॅकेजिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीत बांधणीचे पुठ्ठे तयार होतात. रवींद्र सपकाळे हा गेल्या १६ वर्षांपासून या कंपनीत कामाला होता. बुधवारी दुपारी रवींद्र कंपनीत नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक काही यंत्रांमध्ये विजेचा प्रवाह उतरला असल्याचे त्याच्या लक्षात आले. नेमका काय प्रकार आहे, हे तपासत असताना तो कंपनीच्या छतावरील पत्र्यावर चढला. त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खाली जमिनीवर कोसळला.
कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रवींद्रच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सपकाळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.