जळगाव -जिल्ह्यातील कुसुंबा खुर्द येथे मागील 33 दिवसांपासून गावात पाणीपुरवठा झालेला नसल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला. शेकडो महिलांनी दुपारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच आणि सदस्यांना जाब विचारायचा आहे, त्यांना बोलवून घ्या, अशी आग्रही मागणी केली. आपल्या समस्येची समाधानकारक उकल होत नसल्याचे लक्षात आल्यावर या महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.
फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत, पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरायला पैसे नाहीत, अशी कारणे सांगितली जात आहेत. ग्रामपंचायत या अडचणींचा काहीच विचार करणार नसेल तर ग्रामस्थांनी पाण्याची आशा सोडून द्यायची का, असा सवाल या महिला विचारत होत्या. त्यांच्याशी बोलण्यासाठी सरपंचांचा मुलाने महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानकारक खुलासा करू न शकल्याने पुन्हा महिलांनी कडक भूमिका घेतली होती. या महिलांनी सरपंचांच्या राजीनाम्याचीही मागणी केली . आमच्याकडून काहीच काम होणार नाही, असे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी लिहून द्यावे, अशी मागणी या महिलांनी केल्यावर ग्रामसेवकाने केलेला शिष्टाईचा प्रयत्नही अपयशी ठरला होता. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी कुसुंबा खुर्द ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला.