जळगाव -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १५ दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या बाळंतीणीचा बुधवारी मृत्यू झाला. प्रसूतीवेळी अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. सज्जाबाई आकाश सदमाकी (वय २२, रा. पाचोरा) असे मृत बाळंतीणीचे नाव आहे.
जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात बाळंतिणीचा मृत्यू - jalgaon latest news
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करुन पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आली आहे.
सज्जाबाई हिला दोन वर्षांपूर्वी मुलगा झाला होता. परंतु, काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला होता. यांनतर पुन्हा एकदा ती गर्भवती झाली होती. दरम्यान, १५ मार्च रोजी तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका मुलीस जन्म दिला. दुर्देवाने तिने जन्म दिलेल्या मुलीचा गर्भातच मृत्यू झाला होता. प्रसूतीच्या वेळी अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे सज्जाबाईची प्रकृतीदेखील खालावली होती. तिला गर्भात झालेल्या मुलीच्या मृत्यूचा धक्कादेखील बसला. तिच्यावर रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये उपचार सुरू करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्यामुळे अखेर बुधवारी तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
या घटनेमुळे तिचे पती आकाश सदमाकी यांना प्रचंड धक्का बसला आहे. मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सदमाकी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करून पाचोरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.