महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात लांडग्याच्या हल्ल्यात चार शेतमजूर जखमी

भोलाणे शिवारात शेतात काम करत असलेल्या मजुरांवर अचानकपणे लांडग्याने हल्ला चढवला. यात चौघे गंभीर जखमी झाले.

wolf attack on labour
जळगावात लांडग्याच्या हल्ल्यात चार शेतमजूर जखमी

By

Published : Feb 2, 2020, 2:05 AM IST

जळगाव - तालुक्यातील भोलाणे शिवारात शेतात काम करत असलेल्या मजुरांवर अचानकपणे लांडग्याने हल्ला चढवला. यात चौघे गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी ८ वाजेपासून हा थरार सुरू होता. हा लांडगा गावात शिरत असताना मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करून जंगलाच्या दिशेने हुसकाऊन लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जळगावात लांडग्याच्या हल्ल्यात चार शेतमजूर जखमी

भोलाणे, सुजदे, कानसवाडा पंचक्रोशीतील गावकरी, शेतमजुर नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपापल्या कामात व्यस्त होते. अशात भोलाणे गावाजवळ शेतात काम करत असलेल्या लक्ष्मण शामराव कोळी (वय ४५, रा.भोलाणे), सुकदेव धुडकु कोळी (वय ४५, रा.कानसवाडा), संजय तुकाराम सपकाळे (वय ४०, रा.भोलाणे) व युवराज शांताराम सोनवणे (वय ४०, रा.देऊळवाडा) या चौघांवर अचानकपणे लांडग्याने हल्ला चढवला. यामुळे चौघेही भेदरले होते. लांडग्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी जीवाच्या आकांताने प्रतिकार केला. आरडा-ओरड केली. परंतू, लांडगा त्यांच्यावर अक्षरश: तुटुन पडला होता.

या लांडग्याने चौघांच्या हाताच्या बोटांचे लचके तोडले. दोघांच्या कपाळावर नखाने वार केले. तसेच सर्व अंगावर नखे, दातांनी ओरबडले आहे. आरडा-ओरड ऐकून इतर शेतमजुरांनी घटनास्थळी गर्दी करुन लांडगा पळवण्यासाठी मदत केली. क्षणार्धात झालेल्या हल्ल्यानंतर चौघांना जखमी करून या लांडग्याने भोलाणे गावाकडे धाव घेतली. गावाच्या वेशीवर असलेल्या एका म्हशीवर लांडग्याने हल्ला केला. म्हशीचे लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर काही वेळ लांडगा लपून बसला होता. तोपर्यंत गावात प्रचंड दहशत पसरली होती. पुन्हा एकदा लांडगा समोर येऊन धुडगूस घालू लागला. हा लांडगा थेट भोलाणे गावात शिरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी गावातील मोकाट कुत्र्यांनी लांडग्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दहा-बार कुत्री मागे लागल्याचे पाहून लांडग्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.

लांडगा गावात शिरला असता तर कदाचित आणखी काही तरुण, शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याची शक्यता होती. गावातील मोकाट कुत्र्यांनी लांडग्यावर प्रतिहल्ला केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी चारही जखमींना शासकीय रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details